अष्टप्रधानांची कामे व कर्तव्ये
अष्टप्रधानांची कामे व कर्तव्ये : मल्हार रामराव चिटणीस यांच्या “शककर्ते श्री शिवछत्रपती महाराज” या बखरीत अष्टप्रधानांची कामे व कर्तव्ये सांगितली आहेत. तसेच इतिहास संशोधक का. ना. साने यांना अष्टप्रधानांबद्दलची माहिती सांगणारा एक कागद सातारच्या छत्रपतींच्या दप्तरखान्यात सापडला तो त्यांनी “सनदापत्रे” या पुस्तकात प्रकाशित केलेला आहे. (१) मुख्य प्रधान (पेशवे) : मुख्य प्रधानाने सर्व राज्यकारभार पहावा, राजपत्रावर शिक्का करावा, सेना घेऊन युद्धे करावीत. नवीन मुलूख ताब्यात येईल तो रक्षून व त्याचा बंदोबस्त करून आज्ञेत रहावे. नेमून दिलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार करावा. इतर प्रधानांशी समान बुद्धीने वागावे. राजहित सर्वात महत्त्वाचे समजावे. निःस्वार्थी वृत्ती ठेवून राज्याची व महाराजांची सेवा करावी. सर्व सरदारांनी त्याजबरोबर जावे. (२) अमात्य : अमात्यांनी राज्याच्या उत्पन्नाचा व खर्चाचा जमाखर्च पहावा. दप्तरदार व फडणवीस यांच्याकडून तपासून घेवून छत्रपतींना सादर करावा. छत्रपती जो प्रदेश नेमून देतील त्या प्रदेशाचा राज्यकारभार पहावा. छत्रपतींच्या आज्ञापत्रावर राज्याच्या व महालाच्या हिशेबी कागदपत्रांवर आपली...