अष्टप्रधानांची कामे व कर्तव्ये
अष्टप्रधानांची कामे व कर्तव्ये :
मल्हार रामराव चिटणीस यांच्या “शककर्ते श्री शिवछत्रपती महाराज” या बखरीत अष्टप्रधानांची कामे व कर्तव्ये सांगितली आहेत. तसेच इतिहास संशोधक का. ना. साने यांना अष्टप्रधानांबद्दलची माहिती सांगणारा एक कागद सातारच्या छत्रपतींच्या दप्तरखान्यात सापडला तो त्यांनी “सनदापत्रे” या पुस्तकात प्रकाशित केलेला आहे.
(१) मुख्य प्रधान (पेशवे) : मुख्य प्रधानाने सर्व राज्यकारभार पहावा, राजपत्रावर शिक्का करावा, सेना घेऊन युद्धे करावीत. नवीन मुलूख ताब्यात येईल तो रक्षून व त्याचा बंदोबस्त करून आज्ञेत रहावे. नेमून दिलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार करावा. इतर प्रधानांशी समान बुद्धीने वागावे. राजहित सर्वात महत्त्वाचे समजावे. निःस्वार्थी वृत्ती ठेवून राज्याची व महाराजांची सेवा करावी. सर्व सरदारांनी त्याजबरोबर जावे.
(२) अमात्य : अमात्यांनी राज्याच्या उत्पन्नाचा व खर्चाचा जमाखर्च पहावा. दप्तरदार व फडणवीस यांच्याकडून तपासून घेवून छत्रपतींना सादर करावा. छत्रपती जो प्रदेश नेमून देतील त्या प्रदेशाचा राज्यकारभार पहावा. छत्रपतींच्या आज्ञापत्रावर राज्याच्या व महालाच्या हिशेबी कागदपत्रांवर आपली मुद्रा करावी. व प्रसंगी लष्कराचे अधिपत्य करून युद्धावर जावे.
(३) सेनापती : सर्व सेनेचे रक्षण करावे. सेनेचे अधिपत्य करून लष्करी मोहिमेवर जावे. शत्रुचा पराभव करावा व नवीन प्रदेश जिंकावा. नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचे संरक्षण करावे. सेनेत जे पराक्रम गाजवतील त्यांची नांवे छत्रपतींना सांगून पराक्रमी लोकांचा गौरव करावा, त्यांना बक्षिसे द्यावीत. मानसन्मान करावा, फौजेच्या अडिअडचणी छत्रपतींच्या कानावर घालाव्यात, युद्धातील लुटीचा हिशेब द्यावा, सर्व सेनाधिकान्यांनी सेनापतीच्या आज्ञा पाळाव्यात,
(४) सचिव : छत्रपतीचा सर्व पत्रव्यवहार सचिवाने पहावा. त्यांनी राजपत्रातील मजकूर तपासून अधिक उणे अक्षर शोधून मजकूर शुद्ध करावा. राजपत्रावर संमत असे लिहावे. युद्धात सेनेचे नेतृत्व करावे. नव्याने जिंकलेल्या मुलूखाचा कारभार पहावा. महाल-परगण्याचा हिशेब तपासून त्यावर संमत असे लिहावे.
(५) मंत्री (वाकनीस) : याने राज्याच्या राजकिय व राजनैतिक बाबी सांभाळाव्या. राज्याच्या हेरव्यवस्थेवर देखरेख ठेवावी. परदरबारच्या पाहुण्यांचं आगत स्वागत करावे. छत्रपतींची दिनचर्या लिहावी. त्यांनी केलेल्या कार्याची नोंद ठेवावी. महाराजांच्या भोजनातील पदार्थांची तपासणी करावी. त्याविषयी दक्ष असावे. राजपत्रावर 'संमत” असे चिन्ह लिहावे. वेळप्रसंगी लष्कराचे अधिपत्य करावे व नेमून दिलेल्या प्रदेशाचा कारभार करावा,
(६) पंडीतराव : सर्व धार्मिक अधिकार यांच्या संमतीने चालावेत. पुढे आलेल्या खटल्यात धर्म व अधर्म पाहून अपराध्यास शिक्षा करावी, समाजातील परंपरा, आचार-विचार, प्रायश्चित्त या संबंधीच्या राजपत्रावर त्याने संमतिदर्शक मुद्रा करावी, पंडीत, विद्वान, ब्राह्मण यांचा सन्मान करावा. यज्ञ, शांती, होमहवन, अनुष्ठान यासारख्या गोष्टी करणे आवश्यक असल्यास छत्रपतींना सुचवून त्याप्रमाणे नियोजन करून त्या पार पाडाव्यात.
(७) सुमंत (डबीर) : सुमंत याने राज्याचा परराष्ट्र व्यवहार पहावा. परराज्यातील राजकारणावर लक्ष ठेवावे. परदरबाराचे वकिल आपल्या दरबारी आल्यावर त्यांचे आगत-स्वागत करावे. त्यांच्याशी छत्रपतींच्या सल्ल्याने बोलणी करावीत. पर-राज्यातील राजकारण छत्रपतींना
निवेदन करावे. त्यांच्या विचाराने डावपेच आखावेत. वेळप्रसंगी सैन्याचे नेतृत्त्व करून मोहिमावर जावे. राजपत्रावर संमती चिन्ह करावे.
(८) न्यायाधीश : राज्यातील सर्व प्रकारच्या खटल्यावर न्यायाधीशाचा अधिकार चालावा, खटल्यातील न्याय व अन्यायाची बाजू पाहून न्यायदान करावे. न्यायदान करताना छत्रपतींच्या चारित्रयाला दोष न लागेल असे निष्पक्षपातीपणे न.यायदान करावे. ब्रह्मसभेकडून दिल्या जाणाऱ्या न्यायदानावर लक्ष ठेवावे. राज्यातील प्रमुख खटल्यांच्या निकालपत्रावर “संमत” असे चिन्ह करावे.
राज्याभिषेकानंतर मृत्यूपर्यंत महाराजांनी आपल्या प्रधान मंडळात फारसा बदल केलेला दिसत नाही. परंतु याचा अर्थ त्यांनी अकार्यक्षम प्रधानांना ठेवले असा नाही.
राज्याभिषेकाप्रसंगी निवडलेले सर्व प्रधान महाराजांच्या परिक्षेस उतरले होते ते त्यांना कार्यक्षम वाटत होते. अकार्यक्षम प्रधानास काढून टाकल्याची अनेक उदाहरणे राज्याभिषेकापूर्वी घड़ून गेलेली आहेत. थोडक्यात महणजे जे प्रधान कर्तबगार होते, त्यांना महाराजांनी मुद्दाम दूर केले
नाही. परंतु जे अकार्यक्षम होते, त्यांना दूर करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कसूर केली नाही.
अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना ज्याप्रमाणे आवश्यकता भासेल त्यानुसार लष्करी मोहिमावर जावे लागे. त्याप्रमाणे सेनापतींनाही स्वराज्यातील काही इतर कामे करावी लागत असत. सेनापतीला फौजेच्या अडीअडचणी छत्रपतींच्या कानावर घालाव्या लागत असत. नवीन जिंकलेल्या प्रदेशाचे संरक्षण करावे लागत असे. महाराजांनी सोपविल्यास काही प्रदेशाचा कारभारही खालच्या महसूल अधिकाऱ्यामार्फत पहावा लागत असे. काही वेळा सेनापतीने न्यायनिवाडा केल्याचीही उदाहरणे आहेत. उदा. नेताजी पालकर हे सेनापती होते. तेव्हा अनेकवेळा त्यांचा मुक्काम ज्या ठिकाणी असे त्या भागात त्यांनी रयतेच्या न्यायनिवाड्याची कामे केलेली दिसतात.
थोडक्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हळूहळू गरजेप्रमाणे विकसीत होत गेले असले तरी महाराजांना सेनापतीपदाची गरज प्रारंभापासूनच होती. अगदी सरनौबत म्हणून नसले तरी एखाद्या मोहिमेची जबाबदारी एखाद्यावर सोपविणे, त्याच्याकडूनसै न्यावर नियंत्रण ठेवणे हे कार्य सेनापतीप्रमाणेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वत: सर्वश्रेष्ठ सेनानी असल्याने या महानायकाच्या हाताखाली एकापेक्षा एक वरचढ सेनापती तयार झाले. महाराजांच्या ३५ वर्षाच्या कालखंडात अनेक लढाया झाल्या. काही प्रसंग त्यांच्याजी वावर बेतणारे होते. या सर्वाना तोंड देताना महाराजांना थोडीसुद्धा उसंत मिळाली नाही. तीच अवस्था त्यांच्या सेनाधिकान्यांची होती. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात लष्कर व त्याचा प्रमुख सेनापती यांना खूपच महत्त्व होते. महाराजांनी जिथे घाम गाळला तिथे त्यांच्यासै न्याने रक्त सांडले. त्यामुळेच इतक्या अडीअडचणीतून हे स्वराज्य उभे राहिले.

Comments
Post a Comment